महाराष्ट्रात प्राचीन लेण्यांची समृद्ध परंपरा आहे. अजिंठा-एलोरा, कार्ला, भाजा यांसारख्या लेण्यांप्रमाणेच नाशिक शहराजवळील पांडवलेणी (Pandavleni Caves) हे देखील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. या लेण्या नाशिक शहराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला त्रिरश्मी टेकडीवर वसलेल्या आहेत. बौद्ध धर्माच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या लेण्या आज महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
पांडवलेणी या नावामुळे अनेकांना या लेण्यांचा संबंध पांडवांशी आहे असे वाटते. परंतु प्रत्यक्षात या लेण्या पांडवांनी बनवलेल्या नाहीत. या लेण्यांचा इतिहास बौद्ध भिक्षूंशी आणि प्राचीन व्यापारी मार्गांशी संबंधित आहे. इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.
पांडवलेणीला कसे जायचे?
रस्त्याने
नाशिक शहरातून बस, ऑटो किंवा टॅक्सीने सहज जाता येते. पांडवलेणी नाशिक शहरापासून सुमारे ८.५ किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशन पासून पांडवलेणी हि सुमारे १३.१ किलोमीटर अंतरावर आहे. आपण या नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून टॅक्सीने, ऑटो ने किंवा खाजगी वाहनाने पांडवलेणी पर्यंत जावू शकतो.
विमानाने
या पांडव लेणी पासून जवळचे विमानतळ नाशिक विमानतळ आहे. टेकडीवर पोहोचण्यासाठी पर्यटकांना सुमारे ३०० पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु वर पोहोचल्यानंतर दिसणारे दृश्य आणि ऐतिहासिक वातावरण हा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
पांडवलेणीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
पांडवलेणीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असते.पावसाळ्यात देखील येथे निसर्ग खूप सुंदर दिसतो, पण पायऱ्या ओलसर असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात दुपारी उष्णता जास्त असल्यामुळे सकाळी लवकर भेट देणे योग्य ठरते.
पांडवलेणीचा इतिहास
पांडवलेणी या लेण्यांची निर्मिती इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून ते इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत झाली, असे इतिहासकार मानतात. या लेण्या मुख्यतः बौद्ध भिक्षूंनी ध्यान, अभ्यास आणि वास्तव्य करण्यासाठी तयार केल्या. त्या काळात नाशिक परिसर हा व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. व्यापारी आणि स्थानिक राजांनी बौद्ध भिक्षूंना मदत म्हणून या लेण्यांची निर्मिती केली.
या लेण्यांवर सातवाहन राजवंशाचा मोठा प्रभाव दिसून येतो. सातवाहन राजे आणि त्यांच्या राण्यांनी तसेच श्रीमंत व्यापाऱ्यांनी या लेण्यांसाठी दान दिल्याचे शिलालेखांमधून स्पष्ट होते. काही शिलालेखांमध्ये सातवाहन राजा गौतमिपुत्र सटकर्णी याचा उल्लेख आढळतो. यावरून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल माहिती मिळते.
या लेण्यांमध्ये सापडलेले ब्राह्मी लिपीतील शिलालेख भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे पांडवलेणी हा केवळ पर्यटन स्थळ नसून एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.
लेण्यांची रचना आणि वास्तुकला
पांडवलेणी टेकडीवर एकूण २४ लेण्या आहेत. या लेण्या खडकात कोरून तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक लेण्याची रचना वेगवेगळी आहे. काही लेण्या भिक्षूंना राहण्यासाठी तर काही ध्यान आणि उपासनेसाठी बनवण्यात आल्या आहेत.
या लेण्यांमध्ये मुख्यतः दोन प्रकार दिसून येतात
विहार – भिक्षूंना राहण्यासाठी असलेली खोली
चैत्यगृह – प्रार्थना आणि उपासनेसाठी असलेले सभागृह
काही लेण्यांमध्ये सुंदर स्तंभ, कोरीव काम आणि शिल्पकला दिसते. काही स्तंभांवर प्राण्यांचे, फुलांचे आणि विविध अलंकारिक आकृत्यांचे कोरीव काम केलेले आहे. हि कला त्या काळातील शिल्पकारांच्या उत्कृष्ट कौशल्याचे उदाहरण आहे.
लेण्यांच्या आतील भागात दगडी पलंग, पाण्याच्या टाक्या आणि लहान खोल्या दिसतात. यावरून बौद्ध भिक्षू येथे साधे आणि संयमी जीवन जगत होते हे लक्षात येते.
पांडवलेणीतील महत्त्वाच्या लेण्या
पांडवलेणीमध्ये काही लेण्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये लेणी क्रमांक ३, १० आणि १८ या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात.
लेणी क्रमांक ३ हि मोठी आणि सुंदर लेणी आहे. येथे अनेक स्तंभ आणि कोरीव शिल्प दिसतात. या लेणीत आढळणारे शिलालेख इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
लेणी क्रमांक १० हे एक चैत्यगृह आहे. येथे प्रार्थनेसाठी मोठे सभागृह आणि स्तूप आहे. स्तूपाभोवती भिक्षू ध्यान आणि प्रार्थना करत असत.
लेणी क्रमांक १८ हि देखील मोठ्या आकाराची लेणी असून तिच्या रचनेत प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण दिसते.
पांडवलेणीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
पांडवलेणी या मुख्यतः बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. येथे राहणारे भिक्षू ध्यान, अध्ययन आणि धर्मप्रचार करत असत. त्यामुळे हे ठिकाण त्या काळातील बौद्ध संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते.
या लेण्यांमधील शिलालेखांमुळे त्या काळातील समाजजीवन, व्यापार आणि राजकारण यांची माहिती मिळते. म्हणूनच इतिहास संशोधकांसाठी पांडवलेणी हा अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे.
पांडवलेणीचे नैसर्गिक सौंदर्य
पांडवलेणी टेकडीवरून नाशिक शहराचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. टेकडीवर चढताना आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. पावसाळ्यात येथे निसर्ग अधिकच सुंदर दिसतो.
सकाळी किंवा संध्याकाळी येथे भेट दिल्यास थंड वारा आणि शांत वातावरणामुळे मन प्रसन्न होते. त्यामुळे अनेक पर्यटक आणि फोटोग्राफर येथे फोटो काढण्यासाठी येतात.