वीकेंडला चला अलिबागला: एक अविस्मरणीय प्रवास

अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात वसलेले एक सुंदर किनारी शहर आहे. हे कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे. या अलिबाग शहराची स्थापना सतराव्या शतकामध्ये मराठा सम्राज्याचे नोदलाचे ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी केली होती. अलिबाग हे एक पर्यटन स्थळ असून मुंबई पासून सुमारे ९९ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रायगड पासून सुमारे ११२ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबागचा समुद्र किनारा हा सूर्योदय आणि सूर्यास्त साठी  प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती काळी मऊ वाळू आहे. अलिबाग या ठिकाणी नारळाच्या दुधाचा वापर करून बनवलेले मासे लोकप्रिय आहेत. 

अलिबाग बीच

रस्त्याने 

मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची बसची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई मधील दादर, परेल, बोरिवली आणि ठाणे या ठिकाणांहून महाराष्ट्र शासनाची लालपरी, हिरकणी आणि शिवशाही बसेस उपलब्ध असतात. या प्रवासाला साधारपणे तीन ते चार तास लागतात. 

रेल्वे ने  

अलिबाग शहरापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी आहे. अलिबाग पासून पेण रेल्वे स्टेशन सुमारे २९ किलोमीटर अंतरावर आहे. पेण या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सीने, ऑटोने किंवा रिक्षाने अलिबाग या शहरापर्यंत जावू शकतो. 

अलिबागला जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु 

पावसाळा (जून ते सेप्टेंबर)

 जर तुम्हाला निसर्गाची हिरवळ आणि पाऊस आवडत असेल, तर हा काळ उत्तम आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या काळात बोटींची वाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स बंद असतात.

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

हा पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ आहे. तापमान साधारणपणे १५°C ते ३०°C च्या दरम्यान असते, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती फिरता येते. 

उन्हाळा (मार्च ते मे )

या काळात हवामान थोडे उष्ण आणि दमट असते. त्यामुळे दुपारी समुद्र किनाऱ्यावरती  फिरणे थोडे  कठीण होऊ शकते, मात्र सायंकाळच्या वेळी समुद्राच्या थंड वाऱ्यामुळे समुद्राच्या किनाऱ्यावरती फिरता येते. 

आलिबागच्या आजूबाजूचे पाहण्यासारखे ठिकाणे

T55 रणगाडा 

भारत आणि पाकिस्तान यांच्या १९७१ च्या लढयामद्धे पाकिस्तानला नामोहरम करणारा भारतीय सेन्य दलातील T-55 रणगाडा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पहायला मिळतो. 

खांदेरी किल्ला 

खांदेरी किल्ला हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वसलेला एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. थळ गावाच्या समोर समुद्रातील एका छोट्या बेटावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शवाजि महाराज यांनी १६७९ मध्ये हा जाळदुर्ग बांधला होता. या १६७९ च्या काळामध्ये इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यात समुद्री सत्तेसाठी स्पर्धा सुरू होती. मुंबई  बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मराठा आरमार मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी  खांदेरी किल्ला बांधला होता. खांदेरी किल्ल्याची रचना अत्यंत भक्कम आहे. समुद्राच्या प्रचंड लाटांचा मारा सहन करण्यासाठी जाड दगडी तटबंदी बांधण्यात आली आहे. किल्ल्यात पाण्याच्या टाक्या, मंदिरे, तटबंदी आणि तोफांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

उंदेरी किल्ला 

उंदेरी किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वसलेला एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. थळ गावाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रातील बेटावर हा किल्ला उभारलेला आहे. खांदेरी किल्ल्याच्या अगदी जवळ असल्यामुळे या दोन्ही किल्ल्यांना ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

उंदेरी किल्ल्याची बांधणी इ.स. १६८० च्या सुमारास सिद्दी सरदारांनी केली. त्या काळात समुद्रमार्गावरील सत्ता मिळवण्यासाठी मराठे, इंग्रज आणि सिद्दी यांच्यात स्पर्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी खांदेरी किल्ला बांधल्यानंतर सिद्दी लोकांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून उंदेरी किल्ला उभारला. त्यामुळे या परिसरात समुद्री संघर्षाचे अनेक प्रसंग घडले.

उंदेरी किल्ल्याची रचना अत्यंत मजबूत दगडी बांधकामाची आहे. समुद्राच्या प्रचंड लाटांना तोंड देण्यासाठी जाड तटबंदी करण्यात आली आहे. किल्ल्यात तोफांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि इतर वास्तू आजही पाहायला मिळतात. किल्ल्यावरील तोफा त्या काळातील युद्धतंत्र आणि सागरी संरक्षणाची साक्ष देतात. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता.

वरसोली बीच 

अलिबाग पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणारे वरसोली बीच हे स्वच्छतेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. तसेच या वरसोली बीच वरती कमी गर्दी असते. त्यामुळे ज्या पर्यटकांना कमी गर्दी आणि शांत वातावरण हवे आहे, त्यांच्यासाठी वरसोली बीच हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तसेच वरसोली बीच हा पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. या वरसोली बीचवरती आपण पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना राईड, बंपर राईड यांसारख्या जलक्रीडांचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. वरसोली बीचच्या आसपास खाजगी रिसॉर्ट्स, कॉटेज आणि होमस्टे उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपण राहण्याची सोय करू शकतो. या वरसोली बीचवरती स्थानिक कोकणी पद्धतीचे मासे आणि विविध प्रकारचे कोकणी पदार्थ मिळतात. 

वरसोली बीच वरती कसे जायचे?

रस्त्याने

अलिबाग पासून वरसोली बीच हे सुमारे २.९ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग पासून आपण टॅक्सीने किंवा रिक्षाने आणि प्रायवेट गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

रेल्वे ने 

पेणचे रेल्वे स्टेशन वरसोली पासून जवळचे असून ते सुमारे २७.३ किलोमीटर अंतरावर आहे. 

जलमार्गाने किंवा बोटीने 

मुंबई पासून मांडवा पर्यंत बोटीने येता येते. मांडवा पासून वरसोली बीच वरती आपल्याला टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जाता येते. 

वरसोली बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु 

पावसाळा (जून ते सेप्टेंबर)

 पावसाळ्यात निसर्ग हिरवागार दिसतो, पण मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद असतात. तसेच बोटीने प्रवास करणेही या काळात कठीण होऊ शकते. 

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

हा पर्यटनासाठी पीक सीजन मानला जातो. आकाश निरभ्र असते समुद्रावरून येणारी थंड हवेमुळे समुद्र किनाऱ्यावरती फिरायला मजा येते. तसेच या  काळामध्ये  जेट स्की, पॅरासेलिंग  यांसारखे सर्व वॉटर स्पोर्ट्स पूर्ण क्षमतेने सुरू असतात.

उन्हाळा (मार्च ते मे)

दुपारच्या वेळी हवामान थोडे उष्ण आणि दमट असते, परंतु सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बीचवर वेळ घालवणे उत्तम असते.

नागाव बीच 

नागाव बीच हे अलिबाग पासून सुमारे ८.२ किलोमीटर अंतरावर आहे. नागाव बीच हे स्वच्छ पाण्यासाठी आणि जलक्रीडांसाठी ओळखला जातो. या नागाव बीचचा तीन किलोमीटर लांब पसरलेला निसर्गरम्य असा समुद्र किनारा आहे. तसेच नागाव बीच हा सपाट जागा आणि नारळ-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. या नागाव बीच वरती अनेक स्थानिक स्नॅक्स सेंटर आहेत, जिथे ताजे कोकणी सीफूड आणि घरगुती जेवण मिळते. नागावमध्ये अनेक होमस्टे, कॉटेजेस आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपण राहण्याची सोय करू शकतो. 

नागाव बीच वरती कसे जायचे?

रस्त्याने 

नागाव बीच पासून अलिबागचा बीच हा सुमारे ८.३ किलोमीटर अंतरावर आहे. आपण नागाव बीच वरती टॅक्सीने, ऑटोने किंवा प्रायवेट गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

रेल्वे ने 

नागाव बीच पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी असून ते अलिबाग पासून सुमारे ३४.९ किलोमीटर अंतरावर आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सीने, ऑटोने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो. 

नागाव बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु 

पावसाळा (जून ते सेप्टेंबर)

या काळात निसर्ग हिरवागार दिसतो. परंतु मुसळधार पावसामुळे आणि समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे वॉटर स्पोर्ट्स बंद असतात आणि पोहणे सुरक्षित नसते. 

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

पर्यटनासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. यावेळेस तापमान १५°C ते २८°C च्या दरम्यान राहते, जे फिरण्यासाठी आणि पॅरासेलिंग, जेट स्की यांसारख्या खेळांसाठी योग्य असते.

उन्हाळा (मार्च ते मे)

हवामान थोडे उष्ण आणि दमट म्हणजे तापमान ३०°C ते  ३५°C च्या दरम्यान असते. परंतु संध्याकाळी नागाव बीचवर सूर्यास्त पाहण्यासाठी आणि बीचवर चालण्यासाठी हा काळ उत्तम असतो. मे महिन्या मध्ये अलिबागमध्ये आंबा महोत्सव देखील आयोजित केला जातो.

किहीम बीच 

गर्दीपासून लांब आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी किहीम बीच उत्तम समुद्र किनारा आहे. या किहीम समुद्र किनाऱ्यावरील वाळू पांढरी असून समुद्र किनारा रुंद आहे. किहीमच्या समुद्र किनाऱ्यावरती नारळ आणि सुपारीच्या बागा आणि कॅसुआरिनाच्या झाडांनी वेढलेला समुद्र किनारा आहे. किहीम बीच हा वॉटर स्पोर्ट्स आणि पक्षी निरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. 

किहीम बीच वरती कसे जायचे?

रस्त्याने 

अलिबाग पासून किहीम बीच सुमारे ९.६ किलोमीटर अंतरावर आहे. आपण टॅक्सीने किंवा प्रायवेट गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

बोटीने

मुंबईहून बोटीने मांडावा पर्यंत जाता येते. मांडव्यापासून आपण टॅक्सी, रिक्षा किंवा प्रायवेट गाडीने किहीम बीच वरती पोहचवू शकतो. 

रेल्वे ने 

किहीम बीच पासून जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी आहे. किहीम बीच पासून पेण रेल्वे स्टेशन सुमारे ३०.६ किलोमीटर अंतरावर आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून टॅक्सी किंवा रिक्षाने किहीम बीच वरती जाता येते. 

किहीम बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु 

पावसाळा(जून ते सेप्टेंबर)

पावसाळ्यात किहीमचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य दिसतो. परंतु समुद्र खवळलेला असल्याने आणि मुसळधार पावसामुळे जलक्रीडा म्हणजे वॉटर स्पोर्ट्स बंद असतात. 

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे फिरण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत. हवामान आल्हाददायक १५°C ते २५°C असते. या काळात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आणि फुलपाखरे किहीममध्ये पाहायला मिळतात, जे या बीचचे मुख्य आकर्षण आहे.

उन्हाळा (मार्च ते मे)

उन्हाळ्यात दुपारचे तापमान ३५°C पर्यंत जाऊ शकते. मात्र, ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचा हंगाम साधारणपणे मार्च आणि एप्रिलमध्ये असतो, जो निसर्गप्रेमींसाठी खास अनुभव असतो.

काशीद बीच 

काशीद बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो अलिबाग पासून सुमारे ३२.५ किलोमीटर अंतरावर आहे. काशीद बीच हा पांढरी वाळू आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच काशीद बीच हा कॅम्पिंग साठी लोकप्रिय आहे. या बीचवरती तंबू ठोकून आपण निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकतो. या काशीद बीच वरती आपण  पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना राईड यांसारख्या अनेक जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतो. 

काशीद बीच वरती कसे जायचे?

रस्त्याने 

काशीद बीच हा मुंबई पासून सुमारे १२९ किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे १७५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच अलिबाग शहरापासून सुमारे ३२.५ किलोमीटर अंतरावर आहे. 

रेल्वे ने 

रोहा रेल्वे स्टेशन हे काशीद बीच पासून जवळचे असून ते सुमारे ४७ किलोमीटर अंतरावर आहे. या रोहा रेल्वे  स्टेशन पासून आपण टॅक्सीने, ऑटोने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो. 

काशीद बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु

पावसाळा (जून ते सेप्टेंबर)

या काळात काशीद बीचचे नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळ पाहण्यासारखी असते. परंतु, मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद असतात आणि समुद्रात उतरणे धोक्याचे ठरू शकते. 

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

 हा पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ आहे. हवामान थंड १५°C ते ३०°C  आणि आकाश निरभ्र असते, ज्यामुळे बीचवर फिरणे, कॅम्पिंग करणे आणि सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स खेळणे सोपे जाते.

उन्हाळा (मार्च ते मे)

उन्हाळ्यात हवामान थोडे दमट आणि  उष्ण म्हणजे ३५°C पर्यंत असते. जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर या काळात जाऊ शकता, पण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बीचवर जाणे उत्तम ठरेल.

कुलाबा किल्ला 

आलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती कुलाबा किल्ला आहे. हा कुलाबा किल्ला सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज या कुलाबा  किल्ल्याचा वापर इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी करत असे. या कुलाबा किल्ल्यावरती घोडा गाडीतून सुद्धा जाता येते. तसेच अहोटीच्या वेळी पाणी किल्ल्याच्या पलीकडे जाते. तेव्हा चालत या किल्ल्याकडे जाता येते. या कुलाबा किल्ल्याकडे जाताना भरती आणि अहोटीचे वेळापत्रक बघूनच जावे लागते. 

कुलाबा किल्ल्यावर कसे जायचे?

बोटीने 

मुंबई मधून बोटीने आपण कुलाबा किल्ल्यावर जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला गेट ऑफ इंडिया वरुन कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला स्पीड बोट किंवा फेरी सहज मिळू शकते. अलिबागपासून सर्वात जवळची जेट्टी मांडवा आणि रेवस या ठिकाणी आहे.  

रस्त्याने 

मुंबई मधून अलिबागला जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई पासून अलिबाग हे सुमारे ९९ किलोमीटर तर अलिबाग पासून कुलाबा हा किल्ला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. 

रेल्वे ने 

कुलाबा किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी आहे. कुलाबा किल्ल्यापासून पेण रेल्वे स्टेशन हे किलोमीटर अंतरावर आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा ऑटो ने कुलाबा किल्ल्यावरती जाऊ शकतो. 

कुलाबा किल्लावरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु

पावसाळा (जून ते सप्टेंबर)

पावसाळ्यात भरती-ओहोटीचे गणित बदलू शकते आणि समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे या काळात जाणे टाळणे हिताचे असते.

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

हा पर्यटनाचा मुख्य काळ असून किल्ल्यावर फिरण्यासाठी तापमान १५°C ते २८°C इतके असते. हे तापमान कुलाबा किल्ल्यावरती जाण्यासाठी अतिशय योग्य आहे. 

उन्हाळा (मार्च ते मे)

या ऋतुमध्ये हवामान थोडे उष्ण आणि दमट असते, तरीही तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी किल्ल्याला भेट देऊ शकता.

जंजीरा किल्ला 

अभेद्य किंवा अजिंक्य असणारा जंजीरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड पासून हा किल्ला सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. या जंजीरा किल्ल्याचे खरे नाव जजीरे मेहरूब असे आहे. जंजीरा या शब्दाचा अर्थ पाण्यानी वेढलेले बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर. जंजीरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडत असून तो अरबी समुद्रात आहे. जंजीरा हा किल्ला कोणत्याही बेटावर बांधलेला नाही, तर तो एका खडकावर बांधलेला आहे. या जंजीरा किल्ल्यावर सिंधीचे राज्य होते. जंजीरा किल्ल्याच्या किनाऱ्यालाच लागून मुरुड हे गाव आहे. मुरुड पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. या राजापुरी किल्ल्याच्या पश्चिमेला एका खडकावर जंजीरा हा किल्ला आहे. या जंजीरा किल्ल्यावर सुमारे ५७२ तोफा आहेत. जंजीरा या किल्ल्यावरील कलालबांगडी हि तोफ खूप प्रसिद्ध होती. या तोफे मुळेच जंजीरा हा किल्ला अजिंक्य राहीला. 

जंजीरा किल्ल्यावर कसे जायचे?

जंजीरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडतो. जंजीरा किल्ला पाहण्यासाठी पुणे किंवा मुंबई हून अलिबाग गाठावे. त्यानंतर अलिबागवरून रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावामधून दंडा राजापुरी गाठावे. मुरुड पासून सुमारे एका किलोमीटरच्या अंतरावर दंडा राजापुरी गाव आहे. दंडा राजापुरी गावामधून जंजीरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोट सेवा उपलब्ध आहे. 

जंजीरा किल्ल्यावरती कोकण मधून येण्यासाठी महाड – गोरेगाव – म्हसळे -बोर्लिपचंतन – दिघी गाठावे. यानंतर दिघीहून जंजीरा किल्ला पाहण्यासाठी बोट सेवा उपलब्ध आहे. 

जंजीरा किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे. पाली- रोहा – नागोठणे – साळाव – नांदगाव – मार्गे अलिबाग मार्गे न जाता पाली – रोहा – नागोठणे – साळाव – नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.

रेल्वे ने 

रोहा रेल्वे स्टेशन हे जंजीरा किल्ल्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. या रोहा रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा ऑटो ने जाऊ शकतो. 

जंजीरा किल्ला वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु

पावसाळा (जून ते सप्टेंबर)

 या काळात पर्यटनासाठी किल्ला पूर्णपणे बंद असतो. मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे बोटीची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली जाते.

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)

या महिन्यांमध्ये  फिरण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. ऊन जास्त कडक नसते, त्यामुळे किल्ला फिरताना थकवा जाणवत नाही.

उन्हाळा (मार्च ते मे)

 हवामान उष्ण आणि दमट असते. दुपारच्या वेळी किल्ल्यावर फिरणे थोडे कठीण होऊ शकते, म्हणून सकाळी लवकर जाणे केव्हाही चांगले.

रेवदंडा किल्ला 

अलिबाग पासून सुमारे १७ ते १८ किलोमीटर अंतरावर रेवदंडा या गावामध्ये हा किल्ला आहे. या रेवदंडा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांनी हा किल्ला त्यांच्या कारखान्यांसाठी बांधला होता, त्यासाठी पोर्तुगीजांनी निजामशहाची परवानगी घेतली होती. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी अजूनसुद्धा मजबूत आहे. या रेवदंडा किल्ल्यावरून उत्तर दक्षिणे कडील अरबी समुद्रावर लक्ष्य ठेवता येत होते. 

रेवदंडा किल्ल्यावर कसे जायचे?

रेल्वे ने 

रोहा रेल्वे स्टेशन रेवदंडा किल्ल्यापासून जवळचे असून ते सुमारे ३९ किलोमीटर अंतरावर आहे. या रोहा रेल्वे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी, ऑटोने किंवा प्रायवेट गाडीने रेवदंडा किल्ल्यावरती जाऊ शकता.  

कणकेश्वर मंदिर

अलिबाग पासून कणकेश्वर मंदिर सुमारे १३ किलोमीटर अंतरावर मापगाव या गावामध्ये आहे. भगवान शिवांचे जागृत मंदिर असून ते कान्होजी आंग्रे यांचे कुलदेवत आहे. हे कणकेश्वर मंदिर सुमारे ९०० फुट उंचीवर असून या मंदिरात जाण्यासाठी सुमारे ७०० ते ७५० दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. या कणकेश्वर मंदिराची स्थापत्य शैली यादव कालीन आहे. या मंदिरामधील शिवलिंग सुमारे चार फुट उंचीचे स्वयंभू शिवलिंग आहे. या कणकेश्वर मंदिराच्या परीसरामध्ये काही धर्मशाळा आणि भक्त निवासे उपलब्ध आहेत. आपल्याला कणकेश्वर मंदिराची पहाटेची आरती अनुभवायची असेल तर आपण या धर्मशाळेमद्धे किंवा भक्त निवासा मध्ये राहण्याची सोय करू शकतो. या मंदिराच्या आजूबाजूला काही छोटी हॉटेल्स उपलब्ध आहेत. या हॉटेल्स मध्ये आपल्याला पोहे, चहा-नाश्ता किंवा पिठलं-भाकरी मिळू शकते. 

कणकेश्वर मंदिरामध्ये कसे जायचे?

रस्त्याने 

अलिबागवरून रेवस रस्त्यावर मापगाव फाटा आहे. या फाटाच्या पायथ्यावर जाऊन तेथून पायऱ्या चढाव्या लागतात. 

रेल्वेने 

कणकेश्वर मंदीरापासून जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी असून ते सुमारे २९ किलोमीटर अंतरावर आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सीने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो. 

रामेश्वर मंदिर 

अलिबाग पासून सुमारे सोळा किलोमीटर चौल या गावी असणारे रामेश्वर मंदिर हे जागृत आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर  कोकणातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते, तसेच हे  मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षांहून अधिक जुने असून, कौलारू छप्पर, घडीव दगड आणि समोर सुंदर पुष्करणी तलाव असलेला हेमांडपंथी शैलीचा नमुना आहे. हे मंदिर पेशवे कालीन असून मंदिराच्या आजूबाजूला नारळ-पोफळीची झाडे आहेत. या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला आकर्षक विद्युत रोषणाई आणि उत्सव साजरा केला जातो.

रामेश्वर मंदिरामध्ये कसे जायचे?

अलिबागवरून रेवदंड्याकडे जाणाऱ्या बस किंवा रिक्षाने चौल नाक्यावर उतरून या मंदिरापर्यंत जाता येते. 

दत्त मंदिर 

अलिबाग पासून जवळच चौल-भोवाळे गावामध्ये असणाऱ्या टेकडीवर दत्त मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ४०० ते ४५० वर्ष जुने आणि जागृत स्वयंभू मंदिर आहे. या दत्त मंदिराला सुमारे ७५० पायऱ्या आहेत. या दत्त मंदिराच्या गावी दत्त जयंतीला पाच दिवसांचा मोठा उत्सव असतो. 

कोरलाई लाइट हाऊस 

अलिबाग जवळील कोर्लई गावामध्ये कोरलाई लाइट हाऊस आहे. हे एक दीपग्रह असून त्याची स्थापना  १९५५ मध्ये झालेली आहे. या दीपग्रहा मधून अरबी समुद्राचे आणि आसपासच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. १९६० मध्ये दीपग्रहामध्ये इलेक्ट्रिकल फ्लॅशर बसवण्यात आले आहे आणि २००३ मध्ये अत्याधुनिक रिव्हॉल्व्हिंग यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. हे दीपग्रह स्वयंचलित असून ते रडार आणि उपग्रहाद्वारे समुद्रातील हालचालींवर लक्ष्य ठेवते. हे दीपग्रह कोलई गावात असून ते रेवदंडया गावापासून सुमारे ६ किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

कोरलाई लाइट हाऊस वर कसे जायचे?

एसटी बसने 

अलिबाग बस स्थानकावरून मुरुडकडे जाणाऱ्या कोणत्याही बसने तुम्ही कोरलाई गावापर्यंत जाऊ शकता. तिथून पुढे रिक्षाने किंवा चालत लाईट हाऊसपर्यंत जाता येते.

रस्त्याने 

लाईट हाऊसपर्यंत जाणारा रस्ता खूप अरुंद आहे, जिथे एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. मोठ्या गाड्या गावाजवळ पार्क करून तिथून रिक्षा करणे किंवा चालत जाणे (सुमारे २ किमी) सोयीचे ठरते.

वेळ

लाईट हाऊस पाहण्यासाठी सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० हि वेळ सर्वोत्तम आहे.

अलिबागला जाण्यासाठी पॅक करायच्या वस्तु 

कपडे 

समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना हलके आणि सूती कपडे आवश्यक आहेत. कारण ते उबदार आणि सूर्यप्रकाशित असू शकतात. तसेच या कपड्यांबरोबर पांढऱ्या कलरच्या टोप्या आणि सनग्लासेस सुद्धा घ्यावेत. 

पादत्राणे

वाळूवर चालण्यासाठी सँडल किंवा फ्लिप-फ्लॉपसारखे समुद्रकिनाऱ्याला अनुकूल असे पादत्राणे बरोबर घ्यावे लागतील. 

पोहण्याचे कपडे

जर तुम्ही समुद्रात डुबकी मारण्याचा किंवा जलक्रीडा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पोहण्याचे एक्स्ट्रा कपडे घ्यावे लागतील.  

सूर्यापासून संरक्षण

समुद्राच्या ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असते, तसेच सूर्य किरणांपासून संरक्षित राहण्यासाठी तुम्हाला भरपूर सनस्क्रीन घ्याव्या लागतील. 

कीटकनाशक 

समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी फिरत असताना कीटकनाशक असणे आवश्यक आहे. 

नाश्ता आणि पाणी 

काही नाश्ता आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा, विशेषतः जर तुम्ही किल्ला किंवा जवळच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याची योजना आखत असाल, तर बरोबर तुम्ही काही नाष्टा आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर ठेवा. कारण काही भागात नाश्त्याचे पर्याय फार कमी आहेत. 

रोड ट्रिप 

मुंबई किंवा पुण्याहून अलिबागला जाणारा रोड ट्रिप हा तिथे पोहोचण्याचा सर्वात निसर्गरम्य आणि आनंददायी मार्गांपैकी एक आहे. जर तुम्ही मुंबईहून प्रवास करत असाल, तर तुम्ही मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) वरून गाडीने जाऊ शकता किंवा मुंबई-अलिबाग फेरीने जाऊ शकता. अलिबागला जाणारा फेरी ट्रिप प्रवासाचा वेळ कमी करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला किनारपट्टीच्या उत्तम दृश्यांसह एक अनोखा समुद्र अनुभव देऊ शकतो.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६६ मार्गे गाडीने प्रवास करा.  मुंबई-गोवा महामार्गावरून गाडी चालवणे हा निसर्गरम्य ग्रामीण भाग आणि समुद्र किनारी गावांचा आनंद घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सुव्यवस्थित रस्ते आणि हिरवळ यामुळे प्रवास आनंददायी होतो.

फेरी राईड

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी पर्यंत फेरीने जाणे हा अलिबागला पोहोचण्याचा एक लोकप्रिय आणि निसर्गरम्य मार्ग आहे. मांडवाला पोहोचल्यानंतर, तुम्ही अलिबाग शहरात जलद बस किंवा ऑटोने जाऊ शकता.

रोड ट्रिपमुळे तुम्हाला अलिबागच्या आसपासचे अनेक कमी प्रसिद्ध समुद्रकिनारे, जसे की अक्षी बीच आणि वरसोली बीच तुम्ही पाहू शकता. जे दोन्ही बीच शांत आणि कमी व्यावसायिक आहेत.

कुठे राहायचे 

अलिबागमध्ये विविध प्रकारचे निवास पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आलिशान रिसॉर्ट्सपासून ते बजेट-फ्रेंडली गेस्ट हाऊसपर्यंतचा समावेश आहे. 

लक्झरी रिसॉर्ट्स

अलिबागमध्ये समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश, खाजगी स्विमिंग पूल आणि आलिशान मुक्कामासाठी स्पा सेवा असलेले अनेक प्रीमियम रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.

 मध्यम श्रेणीची हॉटेल्स

 समुद्रकिनाऱ्याजवळ भरपूर मध्यम श्रेणीची हॉटेल्स आणि बुटीक स्टे आहेत जे जास्त महाग नसतानाही आराम देतात.

समुद्रकिनाऱ्यावरील कॉटेज

जर तुम्हाला अधिक ग्रामीण, निसर्गाने भरलेला अनुभव हवा असेल, तर समुद्रकिनाऱ्यावरील कॉटेज आणि होमस्टे उपलब्ध आहेत, विशेषतः किहिम आणि नागाव समुद्रकिनाऱ्यांजवळ हे कॉटेज आणि होमस्टे उपलब्ध आहेत. 

स्थानिक पाककृती

अलिबाग ज्या स्वादिष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध आहे ते चुकवू नका. स्थानिक भोजनालयांमध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन शैलीत बनवलेले ताजे मासे, कोळंबी आणि खेकडे मिळतात. कोकणी थाळी वापरून पहा, ज्यामध्ये भात, फिश करी, सोल कढी आणि लोणचे असते.

FAQ

अलिबागला जाण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता?

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ हवामानामुळे सर्वोत्तम आहे. तरीही, अलिबाग वर्षभर पर्यटनासाठी उत्तम असते. 

मुंबईहून अलिबागला कसे जावे?

फेरी 

गेटवे ऑफ इंडियावरून मांडवापर्यंत बोटीने (स्पीड बोट) जाऊ शकता. मांडव्या पासून तुम्ही टॅक्सी ने किंवा ऑटो ने जाऊ शकता. मांडव्या पासून अलिबाग हा सुमारे १८ किलोमीटर आहे. 

रस्त्याने

मुंबई-गोवा हायवेने किंवा पेण मार्गाने तुम्ही अलिबागला जाऊ शकता. पेण पासून अलिबाग हा सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. 

अलिबागमध्ये पाहण्यासारखी प्रमुख ठिकाणे कोणती?

कुलाबा किल्ला, नागाव बीच, वरसोली बीच, रेवदंडा किल्ला आणि कोर्लई दीपगृह इत्यादी ठिकाणे अलिबाग मध्ये पाहण्यासारखी आहेत. 

अलिबागमध्ये काय जलक्रीडा उपलब्ध आहेत?

बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग आणि बंपर राईड यांसारखे वॉटरस्पोर्ट्स  विविध नागाव आणि वरसोली बीचवर उपलब्ध आहेत. 

अलिबागमध्ये मुक्कामासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती?

शांततेसाठी किहीम बीच परिसर, तर वॉटर स्पोर्ट्ससाठी नागाव बीच जवळ हॉटेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. 


Scroll to Top